डीम्ड कन्व्हेयन्स साठी विशेष मदत केंद्र,-- आमदार नरेंद्र पवार
डीम्ड कन्व्हेयन्स साठी विशेष मदत केंद्र,-- आमदार नरेंद्र पवार
कल्याण:- ( संतोष होळकर ) कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार नरेंद्र पवार यांनी आयोजित केलेल्या डीम्ड कन्व्हेयन्स (मानीव अभिहस्तांतरण) साठी गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष, सचिव व कार्यकारिणी सदस्य यांचा महामेळावा संपन्न झाला. कल्याण पश्चिममधील तब्बल ४२५ सोसायटींनी व ८११ प्रतिनिधींनी उत्स्फुर्तपणे या महामेळाव्यात सहभाग नोंदवला. नूतन विद्यालयाच्या प्रांगणात हा महामेळावा संपन्न झाला.
सामान्य नागरिक कष्टाने कमावलेली आयुष्यभराची पुंजी खर्च करून स्वतःचे हक्काचे घर घेतात, सोसायटी तयार होते. पण जागा मालक व बिल्डर वर्षानुवर्षे त्यांचे जागेवरील हक्क सोडत नाहीत. FSI/TDR घेऊन अवैध बांधकाम करतात. मोफा अॅक्टप्रमाणे कम्प्लेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर संस्था नोंदणीनंतर ६ महिन्याच्या आत बिल्डरने कन्व्हेयन्स डीड करून देणे बंधनकारण केलेले आहे. पण दुर्दैवाने बिल्डर कन्व्हेयन्स डीड करून देत नाहीत. कन्व्हेयन्स डीडसाठी लागणारी कागदपत्रे, होणारा खर्च व कायदेशीर किचकट प्रक्रिया लांबलचक असल्याने फारशा सोसायटी यामध्ये पडत नाहीत. कन्व्हेयन्स डीडमधील सर्वात मोठी अडचण ठरत होती कम्प्लेशन सर्टिफिकेट. पण शासनाने २०१६ साली ही अटच शिथिल केली आहे. कल्याण तालुक्यामध्ये जवळपास ४३०० सोसायट्या आहेत. त्यापैकी २५०० पर्यंत हौसिंग सोसायट्या या कल्याण पश्चिम विधानसभेत आहेत. आजपर्यंत केवळ १०% सोसायट्यांचेही डिम्ड कन्व्हेयन्स झालेले नाही. सध्या १५ % सोसायट्यांची प्रक्रिया सुरु आहे. प्रशासकीय अज्ञान व ऑनलाईन प्रक्रियेमुळे नागरिकांना यासाठी विलंब होत आहे. मतदारसंघात फिरत असताना ही गोष्ट लक्षात आली की शेकडो सोसायट्या आणि जुन्या चाळी मोडकळीस आलेल्या आहेत. मात्र डीम्ड कन्व्हेयन्स नसल्याने त्याला विकासक मिळत नाही, कोणताही बिल्डर तिकडे फिरकत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन डीम्ड कन्व्हेयन्स विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापासूनच “विशेष मदत केंद्र” आपल्या आमदार जनसंपर्क कार्यालयात सुरु करत आहे. आपण मदत केंद्राशी संपर्क साधावा. कागदपत्रे जमा करावीत. त्या पुढील सर्व कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया मदत केंद्राच्या माध्यमातून केली जाईल. जास्तीत जास्त सोसायट्यांनी याचा लाभ घ्यावा. आपल्या सहभागाने कल्याणच्या विकासाला चालना मिळेल असे मत आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.
डीम्ड कन्व्हेयन्स हा विषय केवळ कल्याणचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची समस्या होती. मात्र सरकारने यावर तोडगा काढत कायद्यात सुधारणा केल्यामुळे आता आम्ही पुढाकार घेऊन मदतीसाठी पुढे आलो आहोत. सोसायटीने पुढे येऊन याचा लाभ घेतला तर आगामी काळात शासनाला जास्त काही करावे लागणार नाही. सामान्य माणसांना हवा असलेला विकास सरकार करत आहे. डीम्ड कन्व्हेयन्समुळे सामान्य माणसांना आपल्या नावावर हक्काचे घर होणार असल्याचे खासदार कपिल पाटील यांनी बोलताना सांगितले.
कायदेशीर प्रक्रिया खूप जटील होती मात्र मोफा अॅक्टप्रमाणे कम्प्लेशन सर्टिफिकेट मिळाल्याच्या संस्था नोंदणीनंतर ६ महिन्याच्या आत बिल्डरने कन्व्हेयन्स डीड करून देणे बंधनकारण केलेले आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून आम्हीही सर्व प्रक्रिया ४- ६ महिन्याच्या आत पूर्ण करून तातडीने डीम्ड कन्व्हेयन्स प्रकरण निकाली लावण्यासाठी प्रयत्न करू. डीम्ड कन्व्हेयन्स ही लोकचळवळ झाली पाहिजे. आम्हीं आवाहन करतो मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. आमदार नरेंद्र पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराला शेकडो सोसायट्या धावून आल्या आहेत हे महत्वपूर्ण असल्याचे मत जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
भाजपा शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, कोळी संघाचे नेते देवानंद भोईर, नगरसेवक श्री. अर्जुन भोईर, भाजयुमो प्रदेश सचिव श्री. निखील चव्हाण, ठाणे – पालघर जिल्हा विभागीय सरचिटणीस राजाभाऊ पातकर, जेष्ठ कार्यकर्ते डॉ. चंद्रशेखर तांबडे, मोहन सरक, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा पुष्पा रत्नपारखी, ऍड. माधुरी जोशी आदी पदाधिकारी, वकील बांधव, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा