केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत
प्रगतीचे प्रतिबिंब उमटविणारा
विकसित भारत संकल्पाचा परिपूर्ण आराखडा!
केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत
कल्याण ( प्रतिनिधी ):- ‘येत्या पंचवीस वर्षांत विकसित भारत’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प साकारण्यासाठी पथदर्शी आराखडा दर्शवणारा अर्थसंकल्प, अशा शब्दात केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे. विकासाच्या दिशेने वेगाने मार्गाक्रमणाची हमी देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला असून देशातील शेतकरी, गरीब, महिला शक्ती आणि युवाशक्तीच्या प्रगतीचे प्रतिबिंब उमटले आहे, अशा शब्दांत भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र (नाना) सुर्यवंशी यांनी केंद्र सरकारच्या २०२४-२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
महिला युवक, गरीब आणि शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी समर्पित असलेल्या या विकसित भारत अर्थसंकल्पाने देशाचे भवितव्य घडविणाऱ्या या चार वर्गांच्या कल्याणासाठी नव्या संधी आणल्या आहेत, असेही सुर्यवंशी यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
एक कोटी घऱांच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसवून गोरगरीबांची घरे उजळणारी ‘सूर्योदय योजना’ पंतप्रधानांचा दृष्टीकोन प्रतिबिंबित करत असून याद्वारे होणाऱ्या वीजनिर्मितीमुळे गोरगरीबांच्या खर्चात वर्षाला १५००० ते १८००० रुपयांची बचत होणार आहे असे सुर्यवंशी यांनी म्हटले आहे. आयुष्मान भारत योजनेद्वारे पंतप्रधानांनी आतापर्यंत ३० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येस पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार पुरवले आहेत. आयुष्मान योजनेशी आशा सेविका, आंगणवाडी सेविका आणि सहाय्यक यांना जोडण्याचा महत्वाचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आल्याने या वर्गालाही मोफत उपचाराचा लाभ घेता येईल.
गर्भाशय, मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी ९ ते १४ वयोगटातल्या मुलींच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्याचा महत्वाचा निर्णयही घेण्यात आला आहे. लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढविण्यात येणार आहे. देशातील नऊ कोटी महिलांसह ८३ लाख स्वयंसहायता गटांनी सक्षमीकरण आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून ग्रामीण सामाजिक-आर्थिक परिवर्तन सिद्ध केले आहे. या महिलांच्या यशाने प्रेरित होऊन लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट आणखी वाढविण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. महिला उद्योजकांना ३० कोटींचे मुद्रा योजना कर्ज वितरित करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांत उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांच्या संख्येत २८ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर स्टेम प्रशिक्षणातील महिलांचा सहभाग जगातील अन्य देशांहूनही अधिक, म्हणजे तब्बल ४३ टक्के झाला आहे. देशातील महिला सबलीकरणाच्या प्रामाणिक प्रयत्नांचेच हे यश आहे, असेही नाना सुर्यवंशी यांनी नमूद केले.
रोजगारक्षम वर्गात महिलांचा वाढता सहभाग, तिहेरी तलाक प्रथा रद्द करून महिलांच्या आत्मसन्मानाची जपणूक, लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांसाठी एकतृतीयांश आरक्षण, पीएम आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भारतातील सत्तर टक्क्यांहून अधिक घरांच्या मालकी हक्कात महिलांचा एकत्रित किंवा स्वतंत्र वाटा, अशा निर्णयांतून मोदी सरकारने भविष्यातील विकासाचा अग्रक्रम स्पष्ट केला आहे. गरीब, शेतकरी, युवक आणि महिला हे विकसित भारताचे चार आधारस्तंभ असून त्यांच्या विकासाची मोदी सरकारची नीती परिवर्तनाचे नवे पर्व निर्माण करेल, असा विश्वासही अध्यक्ष नाना सुर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा