एनआरसी कंपनीच्या कामगारांची 841 कोटीची थकीत देणी लवकरच मिळणार - आमदार नरेंद्र पवार


एनआरसी कंपनीच्या कामगारांची 841 कोटीची थकीत देणी लवकरच मिळणार - आमदार नरेंद्र पवार

        कल्याण (संतोष होळकर) : एकेकाळी महाराष्ट्रातील रेयॉन धागा उत्पादन करणारी आंबिवली येथील सर्वात मोठी एनआरसी कंपनीकडे असलेली कामगारांची 841 कोटीची देणी मिळावी व कामगारांना न्याय मिळावा या संदर्भात कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकारातून कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांच्या दालनात बैठक पार पडली. आंबिवली येथील कंपनी २००९ साली बेकायदेशीरपणे बंद करण्यात आली मात्र त्याठिकाणी असणाऱ्या साडेचार हजार कामगारांची पगार आणि देणी न देता हा निर्णय घेतल्याने कामगारांवर प्रचंड अन्याय झाला आहे. कंपनी टाळेबंद होऊन तब्बल नऊ वर्षे झाली आहेत. कामगारांना न्याय देण्यासाठी तातडीने शासनाने यावर कार्यवाही करावी आणि सर्व देणी द्यावी अशी मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी बैठकीत बोलताना केली.


             आंबिवली येथील एनआरसी कंपनी २००९ साली बंद झाल्यामुळे आजूबाजूच्या पाच ते सहा गावांमधील साडेचार हजारपेक्षा जास्त कामगार बेरोजगार झाले आहेत. कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि पगार न देता कंपनी बंद करण्यात आली आहे. त्या अगोदर २००६ पासून कामगारांचा पगार अर्धा करण्यात आला होता. आज कंपनी टाळेबंद होऊन तब्बल नऊ वर्षे झाली आहेत. कंपनी बंद पडल्यानंतर ८४१ कोटी रुपयांची कामगारांची देणी कंपनीकडे थकीत आहेत. यावर न विचार करता अनधिकृतपणे सदर कंपनीतील मशीन आणि वस्तू भंगार असल्याचे सांगून विकले जात आहे. या सर्वांचा विचार गांभीर्याने करून या कामगारांचा प्रश्न सोडवावा असे साकडे आमदार नरेंद्र पवार यांनी कामगारमंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांना बैठकीत बोलताना घातले.

             कामगारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ मात्र कामगारांनी आणि कंपनीने आपले आपले विवरणपत्र तातडीने शासनाकडे जमा करावे. त्यावर मार्ग काढून निश्चितपणे लवकरात लवकर तोडगा काढू. मात्र जोपर्यंत कामगारांची देणी आणि थकीत सर्व बिले दिली जात नाहीत तोवर कंपनीला कोणतेही भंगार विक्री करता येणार नाही आणि तरीही केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याची तंबी कामगारमंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांनी कंपनीला दिली. कामगार आयुक्तांना विशेष लक्ष देण्यास सांगत कंपनीने याबाबत लवकर निर्णय घ्यावा असेही कामगारमंत्री निलंगेकर बैठकीत बोलताना म्हणाले.

             यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त श्री. भोसले, माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, भाजपा मांडा – टिटवाळा मंडल अध्यक्ष सुभाष पाटील, एनआरसी कंपनीचे उपाध्यक्ष एम. एस. शेखावत, महाव्यवस्थापक मारुती वानखेडे, संजय पवार, भीमराव डोळस, कामगार रतन पाटील, विनोद कोट, कुमार वैती, आशा पगारे, फरीदा पठाण आदी कामगार, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत