विधानसभेसाठी भाजपची तयारी सुरू


विधानसभेसाठी भाजपची तयारी सुरू
4 जागांसाठी 3 आमदारांसह 22 इच्छुक


कल्याण, :- निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाने आज कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चार विधानसभा मतदार संघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या नगरसेविका मनीषा तारे यांचे पती साईनाथ तारे कल्याण पश्चिम भाजपतून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. कल्याण पश्चिमेतील विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांना स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत असल्याने भाजप याठिकाणी शिवसेनेला बेसावध ठेवण्याची खेळी खेळण्याची शक्यता आहे.

कल्याण पूर्व, पश्चिम, ग्रामीण आणि डोंबिवली अशा 4 विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवण्यास 22 जण इच्छुक आहेत. पक्षाचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांनी डोंबिवली येथील पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. निरीक्षकांचा अहवाल पक्ष नेतृत्वाकडे सादर केल्यानंतर उमेदवारीबाबत पक्षनेतृत्व अंतिम निर्णय घेईल असे देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण पश्चिमेतील विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्यासह पक्षाच्या नगरसेवकांनी तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ चंद्रशेखर तांबडे आणि महेश जोशी यांनीही इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखती दिल्या आहेत. शिवसेनेच्या नगरसेविका मनीषा तारे यांचे पती साईनाथ तारे यांनीही कल्याण पश्चिमेतून पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी आजच्या मुलाखतीला हजेरी लावली आहे.

कल्याण पूर्वेतून विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी 2009 आणि 2014 यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी त्यांनी थेट भाजपकडे उमेदवारी मागितली आहे.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुलाखत दिली आहे. येथून महेंद्र राजपूत यांनीही इच्छुक म्हणून मुलाखत दिली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात चव्हाण यांचे खंदे समर्थक नंदकिशोर परब, चव्हाण यांचे अन्य एक समर्थक नगरसेवक महेश पाटील यांच्या भगिनी डॉ सुनिता पाटील यांनी इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या आहेत. ॲड आदेश भगत, शिवाजी आव्हाड, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनीही कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघासाठी मुलाखती दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ मनोहर जोशी सर पंचतत्वतात विलिन

ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे आंदोलन

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नाना सुर्यवंशी यांच्याकडून स्वागत