'भारतरत्न' अटलजी... नवी दिल्ली - ‘गीत नया गाता हूँ,‘ असा दुर्दम्य विश्वास कोट्यवधी भारतीयांच्या मनात जागविणारे अग्रणी संसदपटू व दिग्गज राजनेते, वक्ता दशसहस्रेषू, हळव्या मनाचे कवी या साऱ्या गुणांचा समुच्चय असणारे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ऊर्फ कोट्यवधी कार्यकर्त्यांचे लाडके अटलजी आज "भारततरत्न‘ बनले... राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सायंकाळी साडेपाचला वाजपेयी यांच्या 6-कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी जाऊन त्यांना या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले. अटलजींमुळे जणू या सन्मानाचीच उंची आणखी वाढली... पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, लालकृष्ण अडवानी, मुफ्ती महंमद सईद यांच्यासह पाच मुख्यमंत्री, सरसंघचालक मोहन भागवत व सारे केंद्रीय मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना "अटलजी हे मूर्तिमंत स्टेट्समन आहेत व ते खऱ्या अर्थाने भारतरत्नचे मानकरी आहेत,‘ असे नमूद केले.