' स्वच्छता अॅप डाउनलोडसाठी ' पालिका प्रशासन उतरले रस्त्यावर
कल्याण (संतोष होळकर) - स्वच्छ भारत अभियानाला अधिक चालना देण्याच्या उद्देश्याने स्वच्छतेसंदर्भात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षणाअंतर्गत आजपासून विविध उपक्रम हाती घेण्याचे ठरविले आहे. या उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त नागरिकांकडून अॅप डाउनलोड करण्यासाठी महानगरपालिकेने युध्दपातळीवर कार्यवाही सुरु केली आहे. स्वच्छता ऐप डाउनलोड करण्यासाठी पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी नागरी सुविधा केंद्रातील सुमारे 8 ते 10 अधिकारी व लिपिक यांना रस्त्यावर तंबू टाकून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ऍप डाउनलोड करण्यासाठी गळ घालण्याचे काम दिले होते, यासाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आदी स्टेशन बाहेरही रात्री उशिरापर्यंत डाउनलोड करण्याचे काम सुरू होते, मात्र नागरिकांचा म्हणावा तेवढा प्रतिसाद दिसून आला नाही.
शहरांतील साफसफाईची कामे योग्यप्रकारे केली जात आहेत किंवा कसे, यासाठी स्वच्छता अॅपवर नागरिकांनी कच-याचे फोटो पाठवावयाचे आहेत. या अॅपद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या निपटारा जलदगतीने करण्याच्या सूचना आयुक्त पी. वेलरासू यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.
स्वच्छ सर्व्हेक्षण -२०१८ साठी करावयाचा उपाययोजनासंदर्भात आज महापालिकेत बैठक घेवून अॅप डाउनलोड करण्यावर भर देण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. तसेच सर्व विभाग व खाते प्रमुखांना त्यांच्या विभागातील वैयक्तिक स्तरावर जो कर्मचारी जास्तीत जास्त अॅप डाउनलोड करेल, अशा कर्मचा-यास १ हजार रुपये रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्रक दिले जाणार असल्याची आयुक्तांनी याप्रसंगी घोषणा केली. याशिवाय महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांमधील जे विद्यार्थी जास्तीतजास्त अॅप डाउनलोड करण्यासाठी प्रयत्न करतील, त्यांना देखील १ हजार रुपये रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्रक महापालिकेमार्फत दिले जाणार आहे.महापालिकेने ठिकठिकाणी अॅप डाउनलोड करण्यासाठी स्टॉल लावले आहेत. त्या-त्या स्टॉलवर महापालिकेचे कर्मचारी नागरिकांना अॅप डाउनलोड करण्यासाठी आवाहन करीत असून, त्यासोबत अॅप डाउनलोड करुनही दाखवित आहेत. कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानके, महाविद्यालये,महापालिका मुख्यालय अशा विविध ठिकाणी स्टॉल लावण्यात आले असून,नागरिकदेखील हे अॅप डाउनलोड करण्यासाठी नागरिक प्रतिसाद असल्याची महिती पालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांनी दिली.
'रुजवू संस्कृती स्वच्छतेची' या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील सर्व आस्थापना, रिक्षा, महापालिका परिवहन सेवेच्या बसेस व बस थांब्यांवर हे 'बोधचिन्ह ' लावले जाणार असून त्याद्वारे लोकांच्या मनात स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे. तरी नागरिकांनी महापालिकेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देवून स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन आयुक्त पी, वेलरासू यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा